google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

गोड स्वरांचं गुपित शिकवून मोकळा होतो बळीराम महाले

author
0 minutes, 2 seconds Read

वरिष्ठ लिपिक, पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर.

‘रहस्य तार सप्तकातल्या षड्‍जाचे’

देश विदेशात ज्यांचे हजारो शिष्य आहेत, आणि ज्यांनी आपल्या बासरी वादन आणि बासरी गुरुकुल मुळे नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर नेले ते प्रसिद्ध बासरी वादक अनिल कुटे गुरुजी. रविवारी त्यांचे शिष्यगण त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने…

खूप वर्षांपूर्वी एक तरुण कॉलेजला शिकत असताना बासरीच्या प्रेमात पडला. लवकरच त्याला बासरी वाजविणारे एक शिक्षकही भेटले. ते शिक्षक इतकी मधुर बासरी वाजवायचे की त्या तरुणानं त्यांना मनोमन आपलं गुरू मानलं आणि एकलव्याप्रमाणं बासरीचा सराव सुरू केला. काही महिने गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपली बासरी त्या शिक्षकांप्रमाने वाजत नाहीये. काहीतरी कमी आहे. पण काय? हे काही त्याला कळेना. त्यातच आणखी काही महिने गेले.. दरम्यान तो तरुण आपल्या शिक्षकाच्या मागे लागला की गुरूजी माझी बासरी अशी का वाजते? तुमच्यासारखी मला वाजविता का येत नाही? मला शिकवाल का? पण त्याचं आर्जव त्या बासरीवादकांनी हसून दुर्लक्षित केलं आणि इतकंच म्हणाले,
‘वाजवत राहा, येईल आपोआप एक दिवस’..
तरुण तळमळत राहिला. त्यानं आपला रियाज सोडला नाही. जे स्वर येतील, जसं येईल तसं तो वाजवत राहिला आणि वेळ मिळेल तेव्हा आपल्या मानलेल्या गुरूजींची बासरी ऐकत राहिला. त्यातून प्रेरणा घेत राहिला. पण त्यांच्यासारखी बासरी काही केल्या त्याला वाजविता येईना. यातच एक वर्ष सरलं. कॉलेजचं आणि बासरीच्या रियाजाचेही.
लवकरच तो तरुण बासरीवर गाणं वाजवायला शिकला. मात्र ते गाणं वाजवताना त्याला समजत होतं की आपलं काहीतरी चुकतंय..मग तो पुन्हा पुन्हा त्या शिक्षकांच्या मागे लागायचा. वेळ मिळेल तेव्हा त्यांना विचारत राहायचा, ‘गुरुजी मलाही शिकवा ना, तुमच्यासारखं, माझं काय चुकतंय ते सांगा ना?’ पण ते बासरीवादक काही सांगायचे नाहीत.
त्या तरुणाला अशी काय अडचण होती बासरी वादनात, तर त्याला बासरीवर केवळ मंद्र आणि अर्धे मध्यम स्वर वाजविता येत असत. उरलेले मध्यम आणि तार सप्तकातील स्वर त्याला वाजविताच यायचे नाही. थोडक्यात बासरी हातात घेतल्यावर तो मंद्र पंचकापासून वाजवू लागे आणि मध्य सप्तकातील मध्यम( म) पर्यंत तो पोहचे. त्याचा असा समज असे की मंद्र पंचम हाच षड्‍ज आहे (म्हणजे सा आहे) आणि मध्य सप्तकातला मध्यम स्वर (म) म्हणजे निषाद (नि) आहे. त्यानुसार तो वाजवत असे.
असेच दिवस जात राहिले आणि एक दिवस सरावा दरम्यान त्याला आपली नेमकी काय चूक होतेय त्याची जाणीव झाली. ती म्हणजे वरच्या सप्तकातील स्वर आपल्याला वाजविता न येणे ही. मग त्यानं पुन्हा एकदा ज्यांना गुरू मानलं होतं, त्यांना विचारलं,
‘मला वरचे स्वर वाजवायला शिकवता का?’
प्रश्न अगदी नेमका आणि थेट होता. म्हणून त्यांनीही स्पष्ट सांगीतलं,
‘नाही, मी तुला शिकवणार नाही, कारण मलाही कुणी तसं शिकवलं नव्हतं. तू वाजवत राहा येईल तुला आपोआप’
खरं तर ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं, लपविल्यानं नव्हे, पण त्या बासरीवादकांना त्याची पर्वा नसावी. त्यांच्या उत्तरानं तो तरुण हिरमुसला, पण त्यानं आपली चिकाटी सोडली नाही, इतकंच नव्हे, ज्यांना गुरू मानलं त्यांच्याबद्दल अनादराची भावनाही त्याच्या मनाला शिवली नाही. तो आणखी जिद्दीला पेटला. त्याची शिकण्याची तळमळ आणखी वाढली. म्हणतात ना ‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीप्रमाणं एक दिवस बासरी वाजवताना अचानक त्याला एका ठिकाणी अनवट स्वर सापडला. तो तार सप्तकातला षड्‍ज होता. बहुतेक त्याच्या रियाजाच्या तपश्चर्येमुळं, आज सामवेदातले स्वर त्याला प्रसन्न झाले असावेत.
त्यानं मग लगोलग सर्वच स्वर वरच्या सप्तकात वाजवून पाहिले, तर ते वाजविता येत होते. पूर्वी त्याला केवळ खालच्या सप्तकातले सात स्वर वाजविता येत होते. मात्र आज दोन वर्षांच्या सरावानंतर त्याला आजचा दिवस पाहायला मिळाला होता. तो होता बासरीच्या स्वरज्ञानाचा. मंद्र, मध्य आणि तार या तीनही सप्तकांतले स्वर आता तो लीलया वाजवू लागला होता. पूर्वी मंद्र आणि मध्य सप्तकात तो वाजवित असणारं गाणं त्यानं आता मध्य आणि तार सप्तकात वाजवलं, तर काय आश्चर्य. स्वर बरोबर सापडले होते. त्याचे गुरूजी वाजवत होते त्याच प्रमाणं त्याला वरचे स्वर वाजविता येऊ लागले.
यानंतर त्यानं त्याच्या बासरी वादन करणाऱ्या त्या शिक्षकांना होस्टेलच्या खोलीत बोलावलं आणि त्यांना तीनही सप्तकातले स्वर वाजवून दाखवले. त्यावर तुटक प्रतिक्रिया देत शिक्षक इतकंच म्हणाले,
‘बघ मी तुला म्हणालो होतो ना की वाजवत राहिला की आपोआप येईल तुला…’ गुरुजींच्या आदरापोटी तरुण त्यांना काहीच बोलला नाही. मात्र आपल्या मोठ्या भावाला त्यानं सांगीतलं,
‘अण्णा, मला केवळ वरचे स्वर शिकण्यासाठी दोन वर्ष लागले, पण जेव्हा मला बासरी वाजवता येईल ना, तेव्हा मी दहा हजार विद्यार्थ्यांना बासरी शिकवेन आणि हातचं कुठलंही न राखता मी शिकवेन.’
बासरीची तळमळ धरली आणि रोज सराव केला की ती प्रसन्न होते. तशी या तरुणालाही ती प्रसन्न होत गेली. लवकरच तो जगप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या गुरूकुल मद्ये दाखल झाला पण मोठी अडचण होती की, पंडित हरिप्रसाद चौरासिया हे इतके व्यस्थ की अगदीं नवख्या विद्यार्थ्यांना कसे शिकवणार आणि त्यावेळी पंडितजी संगीतात जे विद्यार्थी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच शिकवत असत. नाशिकला नोकरी करून तो तरुण तिथे गुरूकुल मद्ये कसा शिकणार? मग त्यांचेच पटशिष्य श्री विवेक सोनार (ठाणे), श्री रूपक कुलकर्णी (बोरिवली), श्री सुनील अवचट(पुणे), श्री हिमांशु नंदा(कोळवण – पुणे) यांच्याकडे सात दिवसांची, तीन दिवसांची बासरी कार्यशाळा असायची तिथे तो जाऊं लागला. आता घराची आणि संसाराची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यामुळं नोकरी व्यवसाय करून बासरीचे शिक्षण घ्यावं लागणार होतं. त्यासाठी नाशिक- बोरिवली , नाशिक – ठाणे, नाशिक – कोळवण ये-जा करावं लागणार होतं. मोठीच कसरत असणार होती. हा काळ होता २००७-१४चा. तेव्हा ना आजच्या प्रमाणे सोशल मीडियावर बासरी शिकवणारे व्हिडिओ होते, ना ऑनलाईन पद्धतीचे वर्ग. त्यामुळे गुरूजींपुढं बसून ते सांगतील ते पाठ करणे आणि त्याचा नंतर सराव करणे हाच एक मार्ग होता. त्यात कोणताही ‘शॉर्ट कट’ नव्हता. झालं या तरुणाच्या कसोटीचा आणखी एक प्रवास सुरू झाला आणि तो सुमारे ७ वर्ष चालला. तिथं जे काही शिकवलं जाई ते शिकणे आणि परत तेवढाच लांब पल्ला पार करून घरी आल्यावर त्याचा रियाज करणे, असा तो खडतर प्रवास होता. कधीं कधीं तर दोन किंवा चार ओळींच्या अलंकारासाठी सुमारे दहा ते बारा तासांचा प्रवास आणि त्यासाठी खर्चही, इतकं कोण करेल? आणि जर कोणी करत असेल, तर त्याला खरंच बासरीची आस लागलेली आहे, बासरी त्याच्या रक्तात पूर्ण भिनलेली आहे, असंच समजलं पाहिजे.
लवकरच सर्व अडचणींवर मात करून या तरुणानं बासरीचं ज्ञान बऱ्यापैकी अवगत केलं आणि आपल्या प्रतिज्ञेप्रमाणं त्यानं विद्यार्थीही घडवायला सुरूवात केली. आज स्थिती अशी आहे की त्याचे नाशिकसह देश विदेशात शेकडो विद्यार्थी आहेत, त्यातील काही जण संगीत विशारद झाले आहेत. कुणा एके काळी, कुणा एका शिक्षकाने मला बासरी शिकवली नाही, पण मी मात्र सर्वांना बासरी शिकवेन. किमान दहा हजार जणांना शिकवेन.. ही त्याची सकारात्मक प्रतिज्ञा. त्याप्रमाणं तो आजही शेकडो लोकांना शिकवत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ज्या एका रहस्यासाठी तो कॉलेजच्या मानलेल्या गुरुजींच्या मागे लागला असं ते बासरीचं वादनाचं रहस्य काय होतं? ते म्हणजे बासरी फुंकताना मंद्र स्वर हळू फुंकायचे, मध्यम त्यापेक्षा थोडा जोर लावून आणि तार सप्तकातले स्वर आणखी जोर लावून फुंकायचे.. इतकं सोपं !.थोडक्यात बासरीत जसजसा स्वर टिपेला पोहोचतो, तसतसा फुंकताना हवेचा दाबही वाढवावा लागतो. तो जिद्दी आणि मेहनती तरुण म्हणजे दुसरा-तिसरा कुणी नसून देश विदेशातील हजारो आम्हां विद्यार्थ्यांचे आवडते, परम आदरणीय गुरूजी, प्रसिध्द बासरीवादक श्री. अनिलजी कुटे होय !
‘वरच्या स्वरांसाठी हवेचा दाब वाढवायचा हे शिकायला मला दोन वर्ष मेहनत घ्यावी लागली, पण माझ्या विद्यार्थ्यांना बासरीच्या वर्गात पहिल्याच दिवशी, मी हे गोड स्वरांचं गुपित शिकवून मोकळा होतो…कारण माझ्यासारखा त्रास विद्यार्थ्यांच्या वाटेला येऊ नये आणि ते बासरी वादनात मागे राहू नयेत…’
आपले अनुभवी बोल कुटे गुरूजी सांगत असतात, तेव्हा त्यांची विद्यार्थ्यांबद्दल आणि शिकवण्याबद्दल तळमळ दिसून येते. त्याचप्रमाणे अगदी रशिया, कझाक मधील भारतीय संगीताची जाण नसलेले विद्यार्थी देखील ज्यावेळी सावरकरांची जयोस्तुते ही धून बासरीवर अगदी अचूक वाजवतात त्याचप्रमाणे जय जय राम कृष्ण हरी हे भजन त्याच लयीत वाजवतात त्यावेळी
त्यांची मेहनत आठवली की भरलेल्या डोळ्यांनं आणि भारावलेल्या मनानं आपण नकळत बासरी हातात घेतो आणि रियाजाला सुरूवात करतो, तेव्हा मंद्र ते तार सप्तकातील सर्व पंचवीस स्वर आपल्या बासरीवर आता लीलया वाजत असतात. कुटे गुरुजींचे अनेक विद्यार्थी ब्राझील, रशिया, ऑस्ट्रेलिया, कझाकस्तान, जर्मनी, जपान अशा अनेक देशांत विखुरलेले आहेत. बासरी प्रशिक्षण देण्यासाठी त्यांचें परदेशी दौरे सुद्धा चालु असतात. कझाकस्तान या मुस्लिम देशात भारतीय संगीताची (बासरी प्रशिक्षण वर्गाची) स्थापना करणारे ते पहिलेच भारतीय आहेत. त्यांचा मुलगा समृद्ध कुटे याने सुद्धा आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवतांना श्री हिमांशु नंदा यांच्या गुरूकुल मद्ये सहा आणि पद्मविभूषण पंडीत हरिप्रसाद चौरासिया यांच्या गुरूकुल मद्ये सहा वर्ष गुरूकुल पद्धतीनें शिक्षण घेतले असुन कुटे गुरुजींचा संगीताचा वारसा पुढें सुरू ठेवला आहे आणि श्री कुटे गुरुजींची बासरीची इतक्या वर्षांची मेहनत, चिकाटी आणि तपश्चर्या सार्थ झालेली आहे..
अशा या आमच्या अनिल कुटे गुरुजींचा १० मार्च रोजी जन्मदिवस असतो, गुरुजींना त्यांच्या जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा! गुरुजींना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचे बासरी प्रशिक्षण वर्गाचे काम असेच निरंतर व अव्याहतपणे चालू राहो ह्यासाठी आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!

-बळीराम महाले
वरिष्ठ लिपिक, पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *