गेल्या आठवड्यात राज्यात उष्णतेचा अनुभव घेत असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. थंडीने पुन्हा एकदा राज्यात पुनरागमन केले असून तापमानात चार अंशांनी घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेच्या अहवालानुसार, दक्षिण-पूर्व पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे १३ डिसेंबरपर्यंत दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होत असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
मुंबईत सध्या तापमानात घट होऊन किमान तापमान १७.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. उपनगर व नवी मुंबईतही गारवा जाणवू लागला आहे. रात्रीचे तापमान १८-२० अंशांवर राहण्याचा अंदाज असून काही ठिकाणी हा पारा १५-११ अंशांपर्यंत खाली घसण्याची शक्यता आहे.
फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने हवामान स्थिर होण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.