मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने, राहुल नार्वेकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, ज्याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. आवाजी मतदानातून त्यांच्या निवडीला सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली.
मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि विश्वास
राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या कायद्यावरील जाणिवांवर विश्वास व्यक्त केला. फडणवीस म्हणाले, “राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यातील एक वकील आहे. आता अध्यक्षांच्या खुर्चीतदेखील निष्णात वकील आहे, यामुळे या खुर्चीला तुम्ही न्याय द्याल, याची खात्री आहे.”
नार्वेकर यांच्या निवडीचे महत्त्व
राहुल नार्वेकर यांच्या वकिलीच्या पार्श्वभूमीमुळे आणि कठीण परिस्थितीत कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांची निवड झाली. विशेषतः ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद हाताळताना त्यांनी प्रशासकीय दक्षता दाखवली होती.
भाजप नेतृत्त्वाचा विश्वास
मंत्रिपदाच्या स्पर्धेत असतानाही राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदासाठी निवड ही त्यांच्या प्रशासकीय कर्तृत्वावर भाजप नेतृत्त्वाचा विश्वास असल्याचे स्पष्ट करते. विधानसभेच्या नियमांवर बोट ठेवून त्यांनी कामकाजाचे योग्य नियोजन करण्याची क्षमता दाखवली आहे.
राहुल नार्वेकर कोण?
राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत त्यांनी आपले काम प्रगल्भतेने पार पाडले आहे, ज्यामुळेच त्यांची पुन्हा निवड झाली आहे. नार्वेकर यांच्या निवडीने विधानसभेच्या आगामी कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.