कसमादे परिसरातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा रब्बी हंगाम निसर्गाच्या अवकाळी कोपाचा प्रतीक ठरला आहे. परतीच्या पावसाने आधीच शेतकऱ्यांच्या कांदा रोपांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीतून सावरून, मोठ्या आर्थिक ताणाखाली शेतकऱ्यांनी नवीन कांदा रोप लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिवाळ्यात अवकाळी पाऊस सुरू झाल्याने दुसऱ्यांदा लावलेले रोपही भक्षस्थानी पडले.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानानंतर ५ डिसेंबर रोजी सकाळपासून कसमादे परिसरात जोरदार पावसाने सुरुवात झाली. जुनी शेमळी, नवी शेमळी, आराई येथील शेतकऱ्यांनी नव्या आशेने कांदा रोप लावले होते, मात्र पावसाने सगळे ह्रदयद्रावक चित्र उभे केले. आराई येथील प्रशांत अहिरे यांनी दोन एकरांत तयार केलेला लाल कांदा काढण्यासाठी दोन दिवस मेहनत घेतली होती. १०० क्विंटल कांदा वाळवण्यासाठी पसरवलेला असताना अचानक आलेल्या पावसामुळे त्यांना कुटुंबीयांसह धावपळ करावी लागली.
पहिल्यांदा परतीच्या पावसाने आठ पायली कांदा रोप खराब झाल्यानंतर, शेतकऱ्यांनी नातेवाईकांकडून मदत घेत नवीन तीन पायली रोप तयार केले. मात्र, दुसऱ्यांदा आलेल्या पावसाने तेही नष्ट झाले. परिणामी, यंदा कांदा लागवड करणे अशक्यप्राय होत असल्याचे मत शेमळी येथील युवा शेतकरी तुषार रौंदळ यांनी व्यक्त केले.
निसर्गाच्या सततच्या प्रतिकूलतेमुळे कसमादेतील शेतकरी हतबल झाले आहेत. शेतीतील पिकांसाठी मोठ्या मेहनतीसह आर्थिक गुंतवणूक करूनही हातात निराशा येत असल्याने शेतकरी अक्षरशः अश्रू ढाळत आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासकीय मदतीची तातडीने गरज आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच शेतसारा माफ करणे आणि बी-बियाणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अन्यथा, यंदा कांदा लागवडीत मोठी घट होऊन शेतकऱ्यांची अवस्था आणखी गंभीर होईल.