नाशिक: सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर निमा इंडेक्स-24 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शनाचा त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम इस्टेट येथे आज (६ डिसेंबर) मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यास दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, जिंदाल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष व्ही. चंद्रशेखरन आणि अनेक नामांकित उद्योजक व मान्यवर उपस्थित होते.
चार दिवस चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनात ५०० हून अधिक उद्योजक सहभागी झाले आहेत. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, अपारंपरिक उर्जा, इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही), आणि एआय तंत्रज्ञानाचे स्टॉल्स याठिकाणी प्रमुख आकर्षण ठरत आहेत. हे प्रदर्शन नवोदित उद्योजकांसाठी प्रोत्साहनपर ठरण्यासोबतच, नवीन स्टार्टअप्ससाठी व्यासपीठ निर्माण करण्याचा उद्देश साधणार आहे.
प्रदर्शनामध्ये कर्ज प्रकरणे, व्हेंडर नोंदणी, आणि विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे उद्योजकांना व्यावसायिक विस्तारासाठी एकाच ठिकाणी बहुमूल्य सुविधा मिळणार आहेत.
निमा इंडेक्स-24 चे आयोजन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, त्यांच्या सहकार्याने निखिल पांचाळ, राजेंद्र वडनेरे आणि कार्यकारी समितीने या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. धनंजय बेळे यांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. त्यांच्या मते, “निमा इंडेक्स-24 हे नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल.”
हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार असून, ठक्कर डोम इस्टेट, त्र्यंबकरोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. नाशिककरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या प्रगतीस हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.