नाशिक – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १४-१५ महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यात सातत्याने आंदोलन करणारे आणि रस्त्यावर उतरून विविध आंदोलनांचे नेतृत्व केलेले नाना बच्छाव आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. नांदगाव तालुक्यातील हिंगणे देहरे गावचे माजी सरपंच असलेल्या बच्छाव यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक वेळा आमरण उपोषण, रस्ता रोको, साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन केले आहे.
नाना बच्छाव हे शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते असून, गेल्या १५ वर्षांपासून विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला आहे आणि अनेक वेळा जेलची देखील हवा खाल्ली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांना सतत जाब विचारला असून, आता ते नांदगाव मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत उतरून मतदारांच्या मनातली जागा मिळवण्याच्या तयारीत आहेत.
त्यांचा हा राजकीय प्रवेश मराठा आरक्षणाच्या लढ्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.