पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) सध्या ऑक्टोबर २०२४ च्या परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, जुने आणि नव्या अभ्यासक्रमाच्या घोळामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. पत्रकारीता, विज्ञान, आणि इतर शाखांमध्ये परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अपेक्षित विषय निवडता येत नसल्याने मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
विद्यापीठाने परीक्षा अर्जासाठी लिंक उघडली असली तरी संबंधित शाखांचे विषय अर्ज फॉर्ममध्ये समाविष्ट न केल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नाहीत. विशेषत: एनईपी २०२४ अंतर्गत पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आणि जुन्या बॅचचे २०१९ पॅटर्नचे विद्यार्थी यांच्यातील विषयातील विसंगतीमुळे समस्या अधिक गहन झाली आहे.
विद्यार्थ्यांनी तक्रारी नोंदवल्यानंतरही, विद्यापीठाच्या विविध विभागांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलली आहे. परिक्षा विभाग आणि आयटी विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागत आहे.
विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही देण्यात आली असली तरी, अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने अनेक विद्यार्थी तणावाखाली आहेत.