नाशिक – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील जाहीर सभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. काँग्रेसवर जातीवादाचा धोकादायक खेळ खेळल्याचा आरोप करत मोदी म्हणाले, “काँग्रेस कधीही दलित, मागासवर्गीय, आदिवासी समाजातील लोकांना पुढे येताना पाहू शकत नाही.”
मोदींनी नाशिकच्या विकासाचा मुद्दा मांडत भाजप महायुतीच्या सरकारने नाशिकसाठी विकासाच्या योजना राबवून रोजगाराच्या संधी वाढवल्या असल्याचे सांगितले. आगामी २०२६ च्या कुंभमेळ्यासाठी महामार्ग, वाहतूक व्यवस्था, आणि आयटी पार्कसारख्या प्रकल्पांद्वारे नाशिकचा विकास साधण्यावर भर दिला जात आहे, असेही मोदींनी नमूद केले.
महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
महाविकास आघाडीच्या सरकारवरही मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. “महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी मेट्रो प्रकल्प, वाढवण बंदर, आणि समृद्धी महामार्गाला विरोध करून महाराष्ट्राच्या विकासात अडथळे आणले आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक बदल
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यात धोरणात बदल केल्याचे सांगून मोदी म्हणाले की, “शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून इथेनॉल खरेदीत वाढ करण्यात आली आहे.”
मोदींच्या या आक्रमक वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप महायुतीचे नाशिकमधील समर्थन बळकट होण्याची शक्यता आहे.