नाशिक :- नाशिकमधील S.M.R.K.B.K.A.K. महिला महाविद्यालयातील श्रीमती संजोगा अहिरवार यांनी आपल्या मुलीच्या गंभीर प्रकृतीमुळे विधानसभा निवडणूक २०२४ साठीची नियुक्ती रद्द करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना अर्ज केला आहे. डॉक्टरांनी मुलीची बाळंतपणाची तारीख २० नोव्हेंबर २०२४ दिली असून, या काळात निवडणूक कामकाजात सहभागी होणे त्यांच्या दृष्टीने शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अर्जासोबत संबंधित वैद्यकीय कागदपत्रे जोडून निवडणूक ड्युटी रद्द करण्याची विनंती करूनही नायब तहसीलदारांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे एका महिला कर्मचाऱ्याच्या आरोग्यविषयक गरजा व कुटुंबीयांच्या हिताला धोका निर्माण झाला आहे. यावरून अधिकारी वर्गातील गलथान कारभार आणि संवेदनशील विषयांकडे होणारे दुर्लक्ष यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महिला कर्मचाऱ्यांच्या विशेष परिस्थितीला समजून घेत, त्वरित निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक असताना, प्रशासनाच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त होत आहे.