नाशिक :- महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अंतर्गत मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलतर्फे जलालपूर येथे राष्ट्रीय पोषण महा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन आणि प्रार्थनेने झाली. या वेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. स्वानंद शुक्ल यांनी प्रस्तावना दिली.
या उपक्रमात गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या माता आणि अन्य महिलांची उपस्थिती होती. डॉ. शुक्ल यांनी पौष्टिक आणि सकस आहाराचे महत्त्व अधोरेखित केले, विशेषतः हिरव्या पालेभाज्यांचे आरोग्यसाठी महत्त्व स्पष्ट केले. भगिनींनी स्वतः तयार केलेल्या विविध पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन करून त्यांच्या आहारातील भूमिकेवर प्रकाश टाकला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गावात घरोघरी जाऊन अनेमिया आणि पोषण स्थितीवर सर्वेक्षण केले तसेच ग्रामस्थांना आहार आणि अनेमियाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाला डॉ. एफ. एफ. मोतीवाला यांचे मार्गदर्शन मिळाले. गावचे सरपंच, पंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते. महाविद्यालयाचे डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. गोकुळ आहेर आणि चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.