मुलाच्या शासकीय नोकरीसाठी वणवण करणाऱ्या एका वडिलांना तीन ठगांनी बनावट जॉईनिंग लेटर देऊन तब्बल ८ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हेमराज गंगाराम गायकवाड (४८, रा. ताहाराबाद, जि. नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
गायकवाड यांचा मुलगा एमएसडब्ल्यू आणि डी. एड शिक्षण पूर्ण करूनही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. १२ सप्टेंबर २०२३ रोजी सीबीएस परिसरात, बाळू दादा जाधव, मुन्ना सोन्या कुंबर, आणि शरद राजगुरु उर्फ पाटील या संशयितांशी गायकवाड यांची भेट झाली. संशयितांनी त्यांना मुलासाठी शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवले आणि विविध खर्चासाठी १२ ते १३ लाख रुपये लागतील, असा खोटा विश्वास दिला.
गायकवाड यांनी संशयितांना ८.३५ लाख रुपये दिले, परंतु नोकरीसाठी काहीच पुढाकार होत नसल्याने सात महिन्यांनी फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व सीबीएस परिसरात अशा बनावट एजंटांची साखळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.