नाशिक: विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी सकल मराठा परिवार या सामाजिक संघटनेने मतदान जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. निवडणुकीत योग्य उमेदवार निवडण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी विविध मार्गांनी प्रबोधन करण्यात येत आहे.
सकल मराठा परिवाराच्या वतीने नाशिकमध्ये शाळांच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जनजागृती रॅली, पथनाट्य, पोस्टर्स, आणि व्हिडिओद्वारे नागरिकांना मतदानाची प्रेरणा देण्यात येत आहे. “तुमचे भविष्य घडवा, आजच मतदान करा,” “लोकशाहीची ताकद तुमच्या हातात आहे,” “सशक्त राष्ट्रासाठी मतदान करा” यांसारखे संदेश देत मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
मनपा शाळा क्रमांक ४९, पंचक, नाशिक येथे या अभियानाला विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे सहकार्य लाभले आहे. या अभियानात सकल मराठा परिवाराचे खंडू आहेर, प्रकाश बोराडे, कल्पेश बोराडे, सागर सहाणे, शरद दवडे, योगेश वरखडे, शुभम आहेर, आनंद पाटील, विकास मेदगे, गौरव जाधव, व संपूर्ण टीम सहभागी झाली आहे.
सकल मराठा परिवाराच्या माध्यमातून येत्या २० नोव्हेंबरला राज्यभरात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.