साकूर (ता. पारनेर) – सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी साकूर येथील बसस्थानकाजवळ कान्हा ज्वेलर्समध्ये पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून तब्बल ५०० ते ६०० ग्रॅम सोने आणि रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली. अंदाजे कोट्यवधी रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर दुचाकीवरून पारनेरच्या दिशेने पळाले. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
दुपारच्या सुमारास मास्क लावून आलेल्या पाच जणांनी कान्हा ज्वेलर्समध्ये प्रवेश करून दुकानमालकावर पिस्तुल ताणली. घाबरलेल्या मालकासमोरच त्यांनी दागिने आणि रोख रक्कम बॅगमध्ये भरली. दरोडेखोर दुकानाबाहेर पडताना मालकाचा मोबाईल घेतला आणि रस्त्यात फायरिंग करून लोकांना धमकावले.
पारनेर दिशेने जात असताना मांडवा फाट्यावर लोकांना सावध करणाऱ्या नागरिकांवरही दरोडेखोरांनी गोळीबार केला. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींना पकडण्यासाठी पथके पाठवण्यात आली आहेत.
भरदिवसाच्या या धाडसी दरोड्याने साकूर परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.