नाशिक :- सकल मराठा समाजाने नाशिक येथे झालेल्या बैठकीत एकमुखी निर्णय घेतला की, समाजाचा कोणत्याही गटाला किंवा उमेदवाराला ठरलेला पाठिंबा नाही. समाज सर्वसमावेशक आणि एकसंध आहे. त्यामुळे प्रत्येकाला समाजाच्या हिताचा उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
सकल मराठा समाजाचे नेते नाना बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काल-परवा काही गटांनी व्यक्त केलेल्या पाठिंब्याला सकल मराठा समाजाचा पाठिंबा नाही, असा ठराव पारित करण्यात आला. यावेळी मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या विचारांवर मराठा समाजाची भूमिका अवलंबून असल्याचे पुन्हा अधोरेखित करण्यात आले.
सकल मराठा समाजाने कोणत्याही राजकीय गटात विभागलेले नसल्याचे सांगितले. “जो समाजाच्या हिताचा उमेदवार असेल, त्यालाच मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे,” असे मत बैठकीत व्यक्त झाले.
या महत्त्वाच्या बैठकीला नानासाहेब बच्छाव, संजय फडोळ, राम खुर्दळ, शरद लभडे, श्रीराम निकम, सचिन पवार, चेतन शेवाळे, रोहिणीताई उखाडे, प्रशांत वाळुंजे, शिवाजी शेलार, गिरीश अहिरे, प्रतीक पिंगळे, तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.