यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता ?
नाशिक :- अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने (दि. १७ सप्टेंबर) नाशिकमध्ये गणेश विसर्जनाची मुख्य मिरवणूक सकाळी ११ वाजता भद्रकालीतील वाकडी बारव येथून सुरू होणार आहे. या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक कार्यालयाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. विशेष शाखेमार्फतही अतिरिक्त बंदोबस्ताची आखणी करण्यात येत असून, मिरवणुकीसाठी विविध सुरक्षा उपाययोजनांची आखणी केली गेली आहे.
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्याचे ठरवले आहे. मिरवणुकीच्या दोन्ही बाजूने बॅरीकेडिंग करण्यात येणार असून, मिरवणुकीदरम्यान कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस सतर्क असतील.
नाशिक शहरात गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद या दोन प्रमुख सणांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही सणांच्या मिरवणुकांसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून मिरवणूक मार्गावर सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणूक मार्गावरील सुरक्षेसाठी तब्बल 200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. यामुळे प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. नाशिक शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनाची मिरवणूक (दि. १७ सप्टेंबर) रोजी पार पडणार असून त्याच दिवशी ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकीचेही आयोजन आहे. एकाच वेळी या दोन मोठ्या सणांच्या मिरवणुका होणार असल्यामुळे शहरात वाहतूक व्यवस्थेची योग्य काळजी घेण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील नागरिकांना शांततेने सण साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले असून, कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि सीसीटीव्ही यंत्रणा सतर्क असतील. पोलिसांनी आणखी काही संवेदनशील ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून देखील निरीक्षण करण्याची तयारी केली आहे.
या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेसाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.