कल्याण : लाडशाखीय वाणी समाज मंडळ, कल्याणतर्फे आयोजित गुणगौरव सोहळ्यात समाजातील गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा आदरपूर्वक गौरव करण्यात आला. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर येथे पार पडलेल्या या वार्षिक सोहळ्यात समाजातील तरुण प्रतिभांना प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, नमस्ते नाशिक फाऊंडेशनच्या अध्यक्ष सौ. स्नेहल संदीप देव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विशेषतः ‘तीन स्क्रीन’ – मोबाईल, मॉनिटर, आणि टीव्ही यांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला, ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना डिजिटल व्यसनांपासून दूर राहून अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद मुरलीधर कोतकर (स्त्रीरोग तज्ञ, आई हॉस्पिटल, चाळीसगाव) यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. माजी आमदार श्री. नरेंद्र बाबुराव पवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
लाडशाखीय वाणी समाज मंडळ, कल्याणचे अध्यक्ष श्री. सी. डी. येवले, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र एन. पाखले, सचिव श्री. बी. पी. नावरकर, उपाध्यक्ष श्री. उमाकांत एन. कुडे, खजिनदार श्री. रामकृष्ण एन. मराठे, आणि अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून सन्मान सोहळ्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाची प्रशंसा करत समाजातील विविध स्तरांतील योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.