दिंडोरी: दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचाराला शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले व सहकार नेते सुरेश डोखळे यांनी उत्स्फूर्त समर्थन दिल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम आणि पूर्व भागात एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवण्याचा निर्धार जुन्या व नव्या शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे, तर शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे या मतदारसंघात झिरवाळ यांचा विजय जवळजवळ निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
धनराज महाले, जे आधी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार होते, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयासाठी माघार घेण्याची विनंती केली. महाले आणि डोखळे यांच्यासह शिवसेनेचे इतर प्रमुख पदाधिकारी भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख अमोल कदम आणि नंदु बोंबले यांनी झिरवाळ यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला आहे.
महाविकास आघाडीला मोठा धक्का
धनराज महाले आणि सुरेश डोखळे यांच्या उपस्थितीत नळवाडपाडा येथे मोठा जल्लोष झाला. शिवसैनिकांनी ‘डोखळे-महाले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’ या घोषणांनी वातावरण दणाणून टाकले. शिवसेनेच्या बळकटीमुळे झिरवाळ यांच्या प्रचारात नवा जोश निर्माण झाला आहे.
धनराज महाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयी उमेदवारांसाठी आपण माघार घेतली आहे. आम्ही महायुतीचे उमेदवार ना. झिरवाळ यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करून त्यांच्यासाठी सिंहाचा वाटा उचलू.”
तुतारीला मतदान म्हणजे दहशतीला मतदान – मतदारांची प्रतिक्रिया
नळवाडपाड्यातील अनेक मतदारांनी ना. झिरवाळ यांच्याकडे “तुतारीला मतदान म्हणजे दहशतीला मतदान” असल्याची भावना व्यक्त केली. “विरोधकांचा पोलिसांवर दबाव नको, आणि तुमचा स्वभाव साधा आहे; तुमच्यामुळे आमच्यासारख्या साध्या नागरिकांना दहशतीशिवाय आयुष्य जगता येते,” अशा शब्दांत मतदारांनी झिरवाळ यांना पाठिंबा दिला.
लोकसभेतील चुक विधानसभेत करू नका – डोखळे
ठेपणपाडा येथील सहकार नेते सुरेश डोखळे यांनी “महायुतीचे उमेदवार ना. झिरवाळ यांना निवडून आणणे हे महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे” असे मत व्यक्त केले. कादवा कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी असलेल्या मजबूत संबंधामुळे डोखळे यांच्या पाठिंब्याचा महायुतीला प्रचंड लाभ होणार आहे.
महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांना हादरवले
खेडगाव, वणी, मोहाडी आणि अन्य गटांमध्ये शिवसैनिकांची एकजूट झिरवाळ यांच्या प्रचारात दिसून आली. या नेत्यांच्या सक्रीय सहभागामुळे महाविकास आघाडीला गती कमी झाल्याचे जाणवत आहे. गटातील जुने शिवसैनिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून झिरवाळ यांच्या विजयाची चर्चा खेडोपाडी, गावागावांत आणि सोशल मीडियावर गाजत आहे.
महायुतीच्या एकजुटीतून झिरवाळ यांचा विजय निश्चित
शिवसेनेचे, भाजपचे, रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रवादीचे सर्व घटक एकत्र येऊन काम करीत असल्याने, ना. झिरवाळ यांच्या विजयाची शक्यता वाढली आहे.