नाशिक: शहरातील कालिका मंदिरासमोरील कालिका प्लाझा येथे ‘लेनोरा माईंडट्यून कन्सल्टंट्ज’ या वेलनेस कौशलिंग व थेरपी सेंटरचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता थाटात पार पडले. या प्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक आणि सौ. प्रिया कर्णिक यांच्यासह नामांकित बांधकाम व्यावसायिक श्री. दीपक चंदे व सौ. दीपा चंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या सेंटरचे संचालन मानसशास्त्रज्ञ डॉ. सिताराम कोल्हे आणि त्यांच्या पत्नी वैशाली कोल्हे यांनी केले आहे. उद्घाटन समारंभात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते सेंटरमध्ये शुभ कलश ठेवण्यात आला. पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव यांचाही विशेष सहभाग होता.
पोलीस आयुक्त कर्णिक यांनी भाषणात ‘लेनोरा माईंडट्यून’ सेंटरच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी नमूद केले की, या सेंटरमुळे नाशिकसह जिल्ह्यातील रहिवाशांना मानसिक आरोग्यासाठी अत्याधुनिक आणि शास्त्रशुद्ध सेवा उपलब्ध होणार आहे. या सेंटरमधून प्रत्यक्ष भेटीसोबतच ऑनलाइन माध्यमातून देश-विदेशातील लोकांना लाभ मिळणार आहे.
पोलीस आयुक्तांनी त्यांच्या भाषणात असेही स्पष्ट केले की, यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणारे विद्यार्थी, जीवनात संतुलन साधणारे जोडपे, तणावग्रस्त कामकाजी व्यक्ती, औद्योगिक क्षेत्रातील कामगार, उच्चपदस्थ अधिकारी, तसेच सेलिब्रिटी या सर्वांसाठी हे सेंटर उपयुक्त ठरणार आहे. येथे सायकोमेट्रिक टेस्टिंगच्या माध्यमातून मानसिक समस्यांना तोंड देणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन मिळेल.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. सुनील अहिरे यांनी पार पाडली, तर आभार प्रदर्शन श्री. तेजस अहिरे यांनी केले.
या प्रसंगी ‘लेनोरा माईंडट्यून’ सेंटरच्या स्थापनेत योगदान देणाऱ्या सर्वांचा सन्मान पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आला. या सेंटरचे डिझाईन करणारे श्री. ईजि. व आर्किटेक्ट राजेंद्र पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी या सेंटरचे संचालक डॉ. सिताराम कोल्हे आणि वैशाली कोल्हे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.