राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने राबवलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार असून त्यात मानधन वाढीची शक्यता आहे. भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी योजनेबाबत स्पष्टता देत महायुती सरकारच्या संकल्पपत्रातील आश्वासन पूर्ण होणार असल्याचे सांगितले आहे.
मुनगंटीवार यांनी नमूद केले की, वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या कुटुंबातील महिलांना तसेच कर भरणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेसाठी ठरलेले निकष पूर्ववत राहतील, आणि या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या अर्जदारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
योजनेच्या मानधनात वाढीचा निर्णय मंत्रिमंडळावर अवलंबून आहे. बजेटमध्ये तरतूद आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी नक्कीच वाढ होईल, असे मुनगंटीवार यांनी सूचित केले. या योजनेसाठी सरकारने ४५,००० कोटी रुपयांचे बजेट ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुतीच्या या घोषणेमुळे महिलांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची अपेक्षा आहे.