शिर्डीहून नाशिकला आलेल्या ई-बसने (एम.एच.०४ एलक्यु ९४६२) महामार्ग बसस्थानकावर फलाटाजवळ अचानक नियंत्रण गमावल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
मृत महिलेचे नाव अंजली थट्टीकोंडा-नागार्जुन (२३, रा. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असून, त्या पती मुपाल्ला नागार्जुन (३०) यांच्यासोबत चौकशी कक्षाजवळ चालत असताना बसच्या धडकेत सापडल्या. या धडकेत अंजली यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुपाल्ला थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. याशिवाय चौकशी खिडकीजवळ माहिती घेत असलेले गोरक्ष मछिंद्र गोसावी (५७, रा. पाथर्डीफाटा) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात घडताच संतप्त प्रवाशांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. बसचालकाला तत्काळ ताब्यात घेण्यात आले असून मुंबई नाका पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
या दुर्दैवी घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रवासादरम्यान अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची मागणी होत आहे.