नाशिक – पुणे येथील सोन्याच्या दरोड्यातील मुख्य आरोपीला नाशिक पोलिसांच्या तातडीच्या आणि धाडसी कारवाईने नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून सिनेस्टाइल पद्धतीने अटक करण्यात आली. आरोपी अमित पाल हा पश्चिम बंगालकडे पळण्याच्या तयारीत असताना, रेल्वे थांबवून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या कारवाईत पुणे पोलिसांना नाशिक पोलिसांची महत्त्वपूर्ण मदत मिळाली. पुणे शहरातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ३२ लाख १६ हजार रुपयांचे ४८० ग्रॅम वजनाचे अर्धवट तयार केलेले सोने चोरून आरोपी पळाला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी अमित पाल हा मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याचा माग काढला असता, तो पश्चिम बंगालकडे रेल्वेमार्गे पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले.
पुणे पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सातपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राकेश न्हाळदे आणि त्यांच्या टीमने नाशिक रोड रेल्वेस्थानकावर त्वरित हालचाल करत अमित पालचा शोध घेतला. रेल्वे काही मिनिटांपूर्वीच निघाली असल्यामुळे, पोलिसांनी रेल्वे प्रशासनाच्या मदतीने ती थांबवून, अमित पालला थरारक पद्धतीने अटक केली.
या प्रकरणातील दुसरा आरोपी मुकेश काशीनाथ पंखिरा यालाही मुंबईच्या भाईंदर येथून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांनाही नाशिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात यश आले असून, चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले जाईल, आणि सोन्याच्या चोरीप्रकरणात न्याय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.