नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून नव्याने तयार होणारा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी दिल्ली येथे खा. राजाभाऊ वाजे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीवर सविस्तर चर्चा झाली.
हा प्रकल्प मागील काही वर्षांपासून रखडला होता, मात्र खा. वाजे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे त्याला गती मिळाली आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रेल्वे मार्ग शिडीमार्गे की संगमनेरमार्गे जाईल, याबाबतचा संभ्रम होता. आता जुन्या प्रस्तावानुसार हा मार्ग ठरवला गेला आहे. यासाठी नारायणगाव येथील जीएमआरटी (Giant Metrewave Radio Telescope) या संवेदनशील प्रकल्पाला वळसा घालून नव्याने रेल्वेमार्ग आखण्याचे काम सुरू आहे.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी खा. वाजे यांना सांगितले की, नवीन डीपीआर अंतिम टप्प्यात असून सर्व तांत्रिक बाबी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत पूर्ण होतील. प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
खा. वाजे यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील मदत घेण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रकल्पामुळे नाशिक आणि पुणे यांच्यातील दळणवळण अधिक वेगवान होणार असून औद्योगिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.