मनमाड शहरातील विवेकानंद नगरसह विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसांत सहा दुचाकी पेटवण्याच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, पोलिसांनी तात्काळ तपास करून सागर जगताप नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
दारूच्या नशेत सागर जगतापने घराबाहेर उभ्या असलेल्या सहा मोटारसायकली पेटवल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. मनमाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सागरला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून अधिक सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.