उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर येथे नितीन शंकर शेट्टी (वय ३२) याचा सहा जणांच्या टोळक्याने तलवार आणि कोयत्याने निघृण खून केला. शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर अवघ्या १० तासांत मुंबई नाका पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली.
नितीन शेट्टी आणि संशयितांमध्ये सकाळी झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. संशयितांपैकी एकाच्या इडली गाडीला लाथ मारल्याने वाद पेटला होता. संध्याकाळी नितीन घरात असताना सहा संशयित तलवार, कोयता आणि इतर शस्त्रांनी सुसज्ज होऊन आले आणि नितीनवर पोट, छाती व हातावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत नितीनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पाच संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची नावे रोशन अशोक निसाळ, गणेश यादव लाखन, नितीन दिलीप गांगुर्डे, गोविंद सुभाष निसाळ, आणि राजेंद्र लाखन अशी आहेत. या टोळक्यावरील अनेक गंभीर गुन्हे यापूर्वीही नोंदवले आहेत.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून या क्रूर हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने पुढे नेला जात आहे.