तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय अनिल करमसिंग तडवी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यातील हा परिसरातील पाचवा बळी असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कालीबेल येथील तडवी कुटुंबातील अनिल हा दलेलपूरजवळील शेतात वावरत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यात अनिलच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर जखम झाल्या. अती रक्तस्त्रावामुळे त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, परंतु तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अनिलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन तळोदा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या घटनेमुळे वनविभाग आणि प्रशासनावर बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याचा दबाव वाढला आहे.