भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सिंधूचा विवाह राजस्थानच्या उदयपूर येथे २२ डिसेंबरला होणार असून २४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे.
सिंधूचा होणारा जीवनसाथी व्यंकट दत्ता साई एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी जेएसडब्ल्यू, सोलर अॅपल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये काम केले असून सध्या पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी एचडीएफसी, आयसीआयसीआयसारख्या मोठ्या बँकांसोबत काम केले आहे तसेच टी२० लीग आणि आयपीएलमध्येसुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
पी.व्ही. सिंधू गेल्या काही काळ खराब फॉर्ममुळे चर्चेत होती, मात्र सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकत तिने पुनरागमन केले आहे. आगामी काळात ती विविध मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून तिच्याकडून भारतीयांना यशाची अपेक्षा आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकं जिंकून सिंधूने आधीच आपल्या कौशल्याची छाप पाडली आहे.
सिंधूच्या विवाहाची बातमी तिच्या चाहत्यांसाठी निश्चितच उत्साहवर्धक आहे, तसेच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.