google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

आपण कोणाच्या भावनिक पिळवणूक ( Emotional Abuse ) चे बळी तर नाहीं ना ?

author
0 minutes, 2 seconds Read

आपण अनेकदा व्यक्ती वर मग ते स्त्री असो पुरुष असो, मुलं असोत, वयोवृद्ध असो त्यांच्यावर होणाऱ्या आत्याचार, अन्याय, पिळवणूक, ब्लॅकमेलिंग, गृहीत धरणे यावर बोलत असतो. हा अत्याचार जसा शारीरिक, मानसिक, आर्थिक असू शकतो तसाच तो भावनिक पण असतो आणि तो सहजासहजी लक्षात येतो का? या विषयावर आजच्या लेखात प्रकाश झोत टाकणार आहोत.

एखाद्याला मारणे, शारीरिक इजा पोहचवणे, एखाद्याची आर्थिक फसवणूक करणे, कोणाचे मानसिक खच्चीकरण करणे, टोमणे मारणे, टोचून बोलणे यालाच अत्याचार म्हणत नाहीत.

आजकाल प्रकर्षाने प्रत्येक नात्यात एकमेकांना emotional abuse करण्याचे प्रमाण खूप वाढलेले दिसते. आजकाल चे नाते संबंध च मुळात आपापले हेतू साध्य करून घेण्यासाठी निर्माण केले जातात. लग्न असो, फ्रेंड शिप असो, अनैतिक शारीरिक संबंध असोत, लिव्ह इन रिलेशन शिप असो, शारीरिक गरजा भगवण्यासाठी शोधलेला तात्पुरता जोडीदार असो अथवा व्यावसायिक संबंध असोत काहीतरी मिळवणे, स्वतःच्या पदरात जास्तीजास्त फायदा पाडून घेणे यावर भर दिला जातो.

जोपर्यंत आपल्या हिशोबाने, आपल्या सोयीने आपल्याला कोणतीही झळ या संबंधा मधून बसत नाही, समोरचा जो पर्यंत आपल्याला आडवा जात नाहीं, आपल्या कंट्रोल मध्ये असतो तोपर्यंत एकदम आनंदाने, हसत खेळत अशी नाती टिकतात किबहुना टिकवली जातात. कधीतरी काहीतरी फायदा नक्की होईल या भाबड्या आशेतून हि नाती ताणली जातात. जेव्हा यातील एखादा स्वतःची मत, आवड, निवड, निर्णय, विचार, अपेक्षा, बंधन दुसऱ्यावर लाधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशी नाती डळ मळीत होऊ लागतात. अनेकदा इच्छा असून पण अश्या नात्यातून बाहेर पडणं सहजासहजी शक्य होत नाही, आपण अश्या नात्यांच्या धुंदीत इतके पुढे गेलेलो असतो कि अनेक गोष्टी, अनेक चांगले खरच जवळचे लोक आपल्यापासून दुरावलेले असतात, दुखावलेले असतात. अश्यावेळी ज्याच्यासाठी हे सर्व केला तो पण जर आपल्या इच्छेनुसार वागत नसेल तर त्याची भावनिक पिळवणूक करून स्वतःच्या मतानुसार वागवणे सुरु केले जाते. जेव्हा सहजासहजी एखादी व्यक्ती आपल्या मनानुसार, मतानुसार वागत नाही तेव्हा त्याला आपल्या नात्याची, केलेल्या प्रेमाची, त्यागाची, मदतीची, सहकार्याची गळ घालून, त्याला भावनिक दबाव आणून, त्याची दिशाभूल करून, त्याला खोटी चुकीची माहिती पुरवून, खोटे आश्वासन देऊन, वचन देऊन, स्वतःच खरं करून घेण्याची सवय लोकांना लागते.

समुपदेशक :- सौं. मीनाक्षी जगदाळे

अगदी साध्या साध्या छोटया छोटया गोष्टीवरून, सवयी वरून एकमेकांना त्रास देणे सुरु होते. घरातील नाती असोत, बाहेरील असोत, आपण बनवलेली नाती असोत अथवा आपल्यावर लादली गेलेली नाती असोत किंवा काळाच्या ओघात निर्माण झालेली नाती असोत, मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीतून माणूस स्वतःला खूप त्रास करून घेतो, त्रागा करतो, रडतो, कुढतो, हतबल होतो. स्वतःला सतत समजावतो, स्वतःला फसवतो, स्वतःच्या मनाची खोटी समजूत काढतो आणि अधिक अधिक फसतं जातो गुंतत जातो. आता आयुष्यात आहे तेच पुढे रेटण्याशिवाय काहीच पर्याय नाही असं समजून अजून भावनिक होतो आणि इथेच तो चुकतो.

अश्या गोष्टी जास्त करून आपण स्वतः तयार केलेल्या, शास्वत नसलेल्या, आधार नसलेल्या नात्यामध्ये जास्त घडताना दिसतात कारण अश्या नात्यांना कोठेही सुरक्षित असण्याची हमी नसते, ते शेवटपर्यंत टिकतील याची कोणतीही ग्वाही नसते किंवा या नात्यांना टिकवून ठेवण्यासाठी कोणीही जबाबदार नसते. भावना मन मोकळ करण्याच्या नादात आपण आपली सर्व माहिती विश्वासाने ज्याला सांगितलेली असते, तोच आपली पोची ओळखून आपल्याला मनस्ताप देण्यात अग्रेसर असतो.

आपल्याला फक्त आणि फक्त बर वाटत राहावं, आपल्याला आयुष्यात कोणीतरी आहे, आपल्याला साथ द्यायला, सुखदुःख वाटून घ्यायला, समजावून घ्यायला, आयुष्यातील इतर समस्या बोलायला कोणीतरी असावे, एकटेपणा घालवायला, आपली स्वप्न पूर्ण करायला मिळेल तो, मिळेल तसा व्यक्ती आपण जवळ करून बसतो.

पराकोटीच्या अविचाराने, पुढील कोणताही विचार न करता अशी नाती जमलेली असतात. हीच नाती जेव्हा डोईजड होऊ लागतात, आपल्या डोक्यावर बसू लागतात तेव्हा एकमेकांवर भावनिक अत्याचार करायला सुरुवात केली जाते.

आपल्या आयुष्यातील वेदना कमी करण्यासाठी पेन किलर म्हणून तयार केलेली नातीच आपल्याला आयुष्यातून उठवायला कारणीभूत ठरतात तेव्हा लक्षात येते कि आपण केवळ दुसऱ्याच्या तालावर नाचण्यात आपल्या आयुष्यातील किती बहुमोल वेळ श्रम पैसा वाया घालवला आहे.

Emotional abuse करून समोरच्याने आपला किती गैरफायदा घेतला आहे हे समजेपर्यंत आपले खूप नुकसान झालेले असते. Emotional abuse ची छोटी छोटी उदाहरण म्हणजे मुद्दाम समोरील व्यक्तीने आपल्याला न आवडणारा, आपल्याला दुखवणारा स्टेटस व्हाट्सअप ला ठेवणे, मुद्दाम आपण डिस्टर्ब होऊ अश्या पोस्ट टाकणं इथपसून ते आपला फोन न घेणे, आपल्या मेसेज ला उत्तर न देणे, आपल्याला जे आवडत नाही तेच करणे, आपण हर्ट होऊ अश्या पद्धतीने सतत वागत राहणे, जाणूनबुजून आपल्याला टाळणे, दुर्लक्ष करणे, सतत अपमानित करणे, आपल्या कडून इच्छा नसताना पण काही गोष्टी करून घेणे, करायला भाग पाडणे, आपल्या भावनांशी खेळणे, आपल्या सुख दुःख यावर नेहमी दुसऱ्याचा कंट्रोल असणे, आपल्याला सतत चुकीचं खोटं ठरवण्याचा प्रयत्न करणे, आपली बदनामी करणे, आपल्याबद्दल अपमानस्पद शब्द वापरणे, आपल्यापासून अनेकदा अनेक गोष्टी लपवून ठेवणे, आपलं मन वळवायला सतत खोट्याचा आधार घेणे अश्या प्रकरची वागणूक आपल्यावर इमोशनल अत्याचार करताना दिली जाते.

प्रेमाच्या आपलेपणाच्या नावाखाली सतत संशय घेतं राहणे, उलटतपासणी घेणे, सारखी बंधन घालत राहणे, सतत एखाद्याच्या विकपॉईंट ला आपल्या फायद्यासाठी वापरणे, सतत समोरील व्यक्तीला स्वतःचे समर्थन द्यावे लागेल या सारखी परिस्थिती निर्माण करणे, अबोला धरणे, सातत्याने एखाद्याला धाकात ठेवणे, आपल्या नजरेच्या इशाऱ्यावर नाचवणे, दडपशाही, हुकूमशाही करून आपला अट्टाहास पूर्ण करून घेणे, समोरच्या चे बोलणे, मत, विचार याला शून्य किंमत देणे यासारख्या गोष्टी करून अनेकजण इतरावर भावनिक अत्याचार करून स्वतःच आयुष्य स्वछंदी पणे जगत असतात.

समोरील व्यक्ती आपल्या वागणुकीमुळे, सवयी मुळे, आपल्या निर्णयामुळे किती त्रस्त होतो आहे, त्याची काय घालमेल होते आहे आणि निव्वळ आपल्यावरील प्रेमामुळे, आपल्या सोबतच नातं जपण्यासाठी तो किती कसरत करत आहे, आपलं मनधरणी करण्यासाठी तो किती लाचार होत आहे, आपलं मन जिंकण्यासाठी समोरील व्यक्ती किती तडजोड करत आहे, आपले शब्द झेलतांना समोरच्याची किती दमछाक होते आहे हे अनेकांच्या गाविही नसते.

त्यामुळे आपण केवळ एखाद नातं टिकवण्यासाठी कोणाच्या इमोशनल अत्याचार चे शिकार होत नाही न? हे वेळोवेळी तपासून बघा. नात्याची गरज दोघांना समान असली पाहिजे दोन्ही बाजूने निःस्वार्थ बांधिलकी, तळमळ, नात्याचा आदर, आपलेपणा असेल तर आणि तरच कोणत्याही नात्यात पुढे जाण्यात अर्थ असतो. नाती मग ती रक्ताची असोत, बनलेली असोत वा बनवलेली असोत आपल्याला आपल्या मजबुरीचा, आपल्या भावनांचा, आपल्या चांगल्या वृत्तीचा गैरफायदा घेऊन जर कोणी गृहीत धरत असेल तर वेळीच सावध होणे आवश्यक आहे. दरवेळी हृदयाने, मनाने विचार करण्यापेक्षा डोक्याने, प्रॅक्टिकल विचार करून, लवकरात लवकर सत्य स्वीकारून, स्वतःची फसवणूक न करता अश्या पोकळ कमकुवत नात्यातून बाहेर पडण्याची, नाहीं म्हणण्याची, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तयारी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अश्या emotional abuse ला बळी पडत राहणे म्हणजेच स्वतःला संपवत राहणे, स्वतःच अस्तित्व पणाला लावणे आहे हे योग्य वेळी ओळखून अश्या परिस्थिती मधून बाहेर पडावे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *