google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिकमध्ये केंद्रीय पथकालाच साक्षात डेंग्यूदर्शन !

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक : शहरात वाढत असलेल्या डेंग्यूच्या रुग्णसंख्येची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य विभागाने घेतली असून, केंद्राचे तीनसदस्यीय पथक नाशिकमध्ये पाहणीसाठी दाखल झालेले आहे. मात्र, या पथकालाही नाशिकमध्ये डेंग्यूदर्शन झाल्याने पालिकेच्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे अधोरेखित झाले.

केंद्राचे पथक शहरात पाहणी करीत असतानाच गोविंदनगरमधील सत्तरवर्षीय रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झाला, तर संभाजी चौकातील एका इमारतीत, तसेच उंटवाडीतील बांधकाम प्रकल्पावर या पथकाला डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे धूरफवारणी कागदावरच होत असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर शहरातील डेंग्यू निर्मूलनासाठी लोकसहभाग, तसेच शाळांचा सहभाग वाढविण्याच्या सूचना महाराष्ट्र, गोव्याच्या केंद्रीय विभागीय संचालक डॉ. सरिता सकपाळ यांनी महापालिकेला केल्या.

शहरात जूनमध्ये डेंग्यूचा प्रकोप पाहायला मिळाला, एक बळीही नोंदवला गेला, तर एका संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला. मेमध्ये ३९ रुग्ण असताना जूनमध्ये १६१ रुग्णांची नोंद झाल्याने नाशिक ‘डेंजर झोन’मध्ये गेले आहे. त्यामुळे डॉ. सपकाळ, डॉ. अरविंद अलोने, कीटकशास्त्रज्ञ माने या तिघांचे पथक बुधवारपासून नाशिकमध्ये आले आहे. या पथकाने गुरुवारी शहरातील उंटवाडी, सिडकोतील संभाजी चौकमधील घरांना भेटी दिल्या. त्यात उंटवाडीतील बांधकाम साइटवर, तसेच संभाजी चौकातील एका इमारतीत वॉचमनच्या रूमशेजारील कुंडीत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याने पथकानेच डोक्याला हात लावून घेतला. केंद्रीय पथकाच्या डॉ. सकपाळ यांनी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण, मलेरिया विभागप्रमुख डॉ. नितीन रावते यांच्यासोबत बैठक घेऊन पालिकेला तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या. डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे निर्देशही दिले. शाळा, सरकारी कार्यालयांना सोबत घेऊन जनजागृती करावी, शासकीय कार्यालये, बांधकाम साइट आदी ठिकाणी डेंग्यूची उत्पत्ती होत असल्याचे आढळल्यास दंड करण्याचे निर्देशही पथकाने पालिकेला दिले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *