google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

दक्षिण मुंबईतील नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्व‍ित

author
0 minutes, 3 seconds Read

मुंबई, दि. ४ : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई येथे सन २०१२ मध्ये मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्व‍ित होत आहे. विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करुन, आपल्या दालनात सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठका निमंत्रित करुन, बहुप्रतीक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तातडीने कार्यान्व‍ित करण्याचा मार्ग प्रशस्त केल्याने प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

नव्याने सुरु होत असलेले नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सध्या जी.टी.रुग्णालय व कामा रुग्णालय, मुंबई या वास्तूमध्ये ५० विद्यार्थी प्रवेश संख्येने शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून कार्यान्व‍ित होणार आहे.  नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जी.टी. रुग्णालय व कामा रुग्णालयांशी संलग्न असेल.  पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ पासून ५० विद्यार्थी प्रवेश संख्या ही दुप्पट म्हणजेच १०० इतकी करण्यात येणार आहे.  भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने नुकतीच याबाबतची परवानगी दिलेली आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने निर्गमित केलेल्या दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजीच्या शासन निर्णयान्वये या नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मंजूरी देण्यात आली होती.   विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्षात कार्यान्व‍ित होण्याच्या दृष्टीने २० नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांच्या दालनात संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती. तसेच वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांशी संपर्क व पाठपुरावा केला. त्यामुळे नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला. आता हे नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्व‍ित होत असल्याने एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढणार आहे.  त्याचबरोबर दक्षिण मुंबईतील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत जलद वैद्यकीय सेवा प्राप्त होणार आहेत.  दक्षिण मुंबईमध्ये प्रलंबित असलेले नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्व‍ित झाल्याबद्दल कुलाबा विधानसभा क्षेत्रातील आणि दक्षिण मुंबईतील विविध सामाजिक संस्था आणि त्याचप्रमाणे रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध स्वयंसेवी संस्था (NGO) यांनी ॲड. नार्वेकर यांचे आणि हा निर्णय तातडीने घोषित करणारे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रत्यक्ष भेटून आणि त्याचप्रमाणे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *