google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक, दि. ८ : आजच्या डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षित राज्य बनविण्याकरीता अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ व संसाधनानी परिपूर्ण अशा प्रकल्प निर्मितीची आखणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 च्या उद्घाटन समारंभा प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, सीमा हिरे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर पोलीस महासंचालक निखील गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. आरती सिंग, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक दत्ता कराळे, पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्‍हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात सायबर सुरक्षेसाठी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्वेस्ट‍िगेशन, सेंटर ऑफ एक्सलन्स, क्लाऊड आधारित डेटा सेंटर, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर यांचा समावेश असलेला 837 कोटींचा सायबर सुरक्षा प्रकल्प निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या प्रकल्पाला राज्यातील सर्व सायबर पोलीस ठाणे जोडण्यात येणार असून 24/7 कार्यरत असणाऱ्या कॉल सेंटरवर दूरध्वनी, मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा पोर्टलवर सायबर गुन्ह्यांविषयक तक्रार नोंदवून या गुन्ह्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यात येणार आहे. तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच पोलीस दलातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरण्याकरीता साधारण १७ हजार पदांची भरती प्रक्रियाही सुरु करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना घरबांधणीसाठी पूर्वीप्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला असून पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मोटार परिवहन विभागासाठी आस्थापना मंडळे गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

जगातही महाराष्ट्र पोलिसांचा जसा लौकीक आहे, तसाच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही दबदबा आहे. यावेळी भारतासाठी पहिलं ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. खेळ, खिळाडुवृत्ती आणि पोलीस दलाचे मनोबल यांचा परस्पर संबंध असल्याने राज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात येतो आहे. खेळातूनच उत्तम पोलीस मनुष्यबळ मिळणार असल्याने क्रीडा सुविधांवरही भर देण्यात येतो. याचअनुषंगाने बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारयाचे नियोजित असून छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठास ५० कोटी रुपये व ४८ हेक्टर जागाही उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विभागीय, जिल्हा आणि तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी विभागीय ५० कोटी, जिल्ह्यासाठी २५ आणि तालुक्यासाठी ५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी रोख पारितोषिकांत पाच पटींनी भरीव वाढ करण्यात आली आहे. खेलो इंडिया, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यातील खेळाडूंना २८ कोटी रुपयांची पारितोषिके वितरीत केली आहेत. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत ५ टक्के आरक्षण देण्यात येत आहे. क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरु केली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

राज्याच्या पोलीस दलातील खेळाडुंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शारिरीक तंदुरूस्तीतून कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची क्षमता, ताकद अंगी येते. पोलीस दलातील प्रत्येकामध्ये एक क्रीडापटू, खेळाडू असतो. या खेळाडूंना पोलीस क्रीडा स्पर्धाच्या निमित्तानं चांगले मैदान मिळत असून हे मैदान जितके गाजवाल, तितकीच चांगली प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देशासाठी उत्तम असे क्रीडापटू मिळातील या अपेक्षेसह सर्वांनी देशाचे आणि पर्यायाने आपल्या राज्याचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचवाण्यासाठी योगदान द्यावे, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

सांघिक क्रीडा प्रकारात हॉकी, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो यांचा तर कुस्ती, ॲथलेटिक, बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग, स्वीमिंग, ज्युदो, क्रॉस कंट्री, त्वायक्वांदो, वु-शू, शुटिंग (स्पोर्ट वेपन), शुटिंग (सर्व्हिस वेपन), पावर लिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, वरिष्ठ अधिकारी शुटींग, 05 कि.मी. चालणे इत्यादी वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे. यास्पर्धेत दोन हजार 444 पुरुष, तर 888 महिला सहभागी झाल्या आहेत.

यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला यांनी केले तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक श्री. कराळे यांनी मानले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

क्रीडा स्पर्धेत सहभागी संघ….

अमरावती परिक्षेत्र, औरंगाबाद आणि नांदेड परिक्षेत्र, कोल्हापुर परिक्षेत्र, नवी मुंबई / मीरा भाईंदर (कोकण परिक्षेत्र), मुंबई शहर, नागपूर शहर, नागपूर परिक्षेत्र, नाशिक परिक्षेत्र, पुणे शहर / पिंपरी चिंचवड आयुक्तालय, रेल्वे परिक्षेत्र, एस.आर.पी.एफ. परिक्षेत्र, ठाणे शहर, प्रशिक्षण संचालनालय.

राज्य पोलीस दलातर्फे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस साजरा

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा वाढदिवस राज्य पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी, कर्मचारी कुटुंबीयांसमवेत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. भुसे, पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला, पोलीस आयुक्त श्री. कर्णिक यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *