मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण निलेश राणे यांनी भाजपाचा निरोप घेण्याची औपचारिक घोषणा केली आहे. राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतः भाजपातून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं उभी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निलेश राणे उद्या (२३ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहेत. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपामधील प्रवास, आदर आणि प्रेमाची आठवण सांगितली, परंतु राजकीय बदलांचा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“शिस्त आणि सन्मान मिळाला, पण नवा राजकीय प्रवास सुरु करतो”
राणे यांनी पत्रकार परिषदेत भाजपातील नेत्यांचा उल्लेख करत, “२०१९ मध्ये मी माझ्या वडिलांसोबत, नितेश राणे आणि आमच्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला होता. भारतीय जनता पक्षाने मला खूप आदर दिला आणि शिस्त शिकवली. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी लहान भावाप्रमाणे सांभाळलं आणि मार्गदर्शन केलं,” असे ते म्हणाले.
तसेच राणे यांनी रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचेही आभार मानले. त्यांनी भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शिवसेना-शिंदे गटासोबत नवा राजकीय अध्याय
राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले आणि शिवसेना-शिंदे गटासोबत भविष्यातील वाटचाल सुरू करण्याची घोषणा केली. “आताची विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार आहोत,” असे राणे म्हणाले.
शिवसेनेत प्रवेश केल्याने राणेंची भूमिका आणि त्यांच्या समर्थकांचे शिवसेनेत आगमन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांचा हा निर्णय आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत देत आहे. राणेंच्या प्रवेशामुळे शिवसेनेला कोकण भागात मोठा आधार मिळेल, तसेच भाजपाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.
भाजपासाठी धक्का, शिवसेनेसाठी संधी
निलेश राणे यांच्या या निर्णयामुळे भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोकणातील राजकीय नेते असलेल्या राणे कुटुंबाचा प्रभाव हा भाजपासाठी महत्त्वाचा होता, परंतु आता शिवसेना-शिंदे गटाशी युती केल्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेला बळ मिळणार आहे.
येत्या काही दिवसांत या राजकीय घडामोडींच्या परिणामी महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते बदल होतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.