नाशिकमध्ये आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या समर्थकांवर तातडीने कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांना निवेदन देण्यात आले. जलील यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीदरम्यान, काही व्यक्तींनी छत्रपती संभाजीनगर येथील फलकांचे विद्रुपीकरण करून “छत्रपती संभाजी महाराज” यांच्या नावाच्या फलकाला काळे फासले, ज्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.
संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. वाघ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महाराष्ट्रातील महापुरुष आमची अस्मिता आहेत, त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.” त्यांनी असेही म्हटले की, इम्तियाज जलील यांच्या सारख्या प्रवृत्ती देशाची एकता खंडित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे यावर तातडीने कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.
या आंदोलनादरम्यान जिल्हाप्रमुख शरद लभडे, प्रफुल्ल वाघ, विकी गायधणी, बळीराम घडवंजे, नितीन काळे, हिरामण नाना वाघ, निलेश गायकवाड, राकेश जगताप आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.