बुलढाणा :- बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील रहिवासी अंबादास सुगदेवराव पवार यांनी तहसील कार्यालय, भुसावळविरोधात एक गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पवार यांनी आरोप केला आहे की, तहसील कार्यालयाने अवैधरित्या वाळू साठा प्रकरणात ठोठावलेला ९ कोटी रुपयांचा दंड अद्याप वसूल केलेला नाही.
पवार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी तहसीलदार भुसावळ यांच्या आदेशानुसार संबंधित वाळू साठ्याप्रकरणी ९ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, दंडाची ही रक्कम आजपर्यंत संबंधितांकडून वसूल करण्यात आलेली नाही. या प्रकरणात माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली असता, जनमाहिती अधिकार्यांनी अपूर्ण माहिती दिली, आणि प्रथम अपील अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसारही संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध करून दिली गेलेली नाही.
या तक्रारीत पवार यांनी असा आरोप केला आहे की, तहसील कार्यालय भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही माहिती दडपण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, महाराष्ट्र जमिन महसुल संहितेच्या नियमानुसार वसुलीची प्रक्रिया योग्यरीत्या पार पाडलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात दोषी अधिकारी यांची चौकशी करुन आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी विनंती पवार यांनी केली आहे.
हा प्रकार उघड झाल्यामुळे संबंधित तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार व कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.