नाशिक – विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता. यानिमित्ताने महायुती व महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले, आणि अखेर यशस्वी ठरले आहेत. विशेषतः नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी अर्ज मागे घेतला आहे.
डॉ. हेमलता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेसकडून लढण्याचा निर्धार केला होता. परंतु, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी डॉ. पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना अर्ज मागे घेण्यास विनंती केली होती. सुरुवातीला पाटील यांनी नकार दिला असला तरी अखेर शेवटच्या क्षणी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली, ज्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच नाशिक मध्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले गुलजार कोकणी आणि हनिफ बशीर यांनीही आपले अर्ज मागे घेतले आहेत. परिणामी, आता या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्यात थेट लढत होणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नांमुळे बंडखोरी शमल्याने, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आता आणखी रोमांचक होण्याची शक्यता आहे.