अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आज दुसऱ्या यादीतील सात उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत सुनील टिंगरे, काका पाटील, निशिकांत पाटील यांसारख्या दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे हलचल निर्माण झाले आहे.
अजित पवार यांनी इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात निशिकांत पाटील यांना उभे करून विरोधकांना धक्का दिला आहे. तसेच, वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई यांच्या विरोधात झिशान सिद्दीकी, तर तासगाव मतदारसंघात संजय काका पाटील यांना उमेदवारी देऊन भक्कम रणनीती आखली आहे. नवाब मलिक यांचे तिकीट कापून त्यांच्या मुली सना मलिक यांना अणूशक्तीनगरमधून उमेदवारी दिली आहे.
अजित पवार गटाने भाजपमधून आलेल्या काका पाटील, निशिकांत पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर यांना संधी दिल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. यासोबतच, काँग्रेसमधून आलेल्या झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे.
पहिल्या यादीतील प्रमुख उमेदवार: अजित पवार (बारामती), छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी), आदिती तटकरे (श्रीवर्धन) आणि नरहरी झिरवाळ (दिंडोरी) यांचा समावेश होता.
या नवीन उमेदवारांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, विरोधकांना कडवे आव्हान उभे केले आहे.