रायगड: गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच, रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून कोसळणाऱ्या जोरदार सरींमुळे उत्सवाच्या तयारीवर पाणी पडेल की काय, अशी चिंता गणेशभक्तांमध्ये आहे. ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे.
सध्या रायगडसह कोकणात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू असून, 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान साजरा होणाऱ्या उत्सवासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. खरेदीसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, परंतु अचानक सुरू झालेल्या पावसामुळे खरेदीवर परिणाम होताना दिसत आहे. ग्राहकांसह दुकानदारांचीही तारांबळ उडाली आहे.
हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात गावाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, पावसाचा अंदाज घेऊनच प्रवास करावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. महामार्गावर प्रवास करताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही प्रशासनाने आवाहन केले आहे.
गणेशभक्तांच्या सुविधेसाठी रायगड जिल्ह्यात १६ ठिकाणी मदतकेंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.