तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या तुफान पावसामुळे आतापर्यंत दोन्ही राज्यांमध्ये एकूण 31 जणांचा मृत्यू झाला असून, पूरस्थितीमुळे सुमारे साडे चार लाख लोकांना मोठा फटका बसला आहे. नद्या आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत.
राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतकार्यास गती देण्यात आली असून, आतापर्यंत 31,238 जणांना 166 मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे. विजयवाडा, गुंटूर, कृष्णा, एलुरु, पायनाडू, बापटला आणि प्रकाशम या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टर तुकड्या गुंटूर आणि एनटीआर जिल्ह्यांमध्ये शोध आणि बचावकार्यात तैनात करण्यात आल्या आहेत.
तेलंगणात 16 तर आंध्र प्रदेशात 15 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. पावसामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला असून, गेल्या 24 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे विजयवाडा आणि आसपासच्या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. इंटरनेट आणि मोबाईल सेवा विस्कळीत झाल्यामुळे हैदराबादमधील कनेक्टिव्हिटीवरही परिणाम झाला आहे.
पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, दीड लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 2,000 कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूरग्रस्त भागाचा दौरा करून या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले आहे.