चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावाच्या हद्दीत टोमॅटो पिकात गांजाची आंतरपीक घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वडनेर भैरव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत २१५ किलो वजनाची व सुमारे ₹१३ लाख किमतीची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तपनपाडा, दूधखेड शिवारात रवींद्र नामदेव गांगुर्डे (वय ४०, रा. तपनपाडा) या शेतकऱ्याने टोमॅटो पिकाच्या आड गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी छापा मारून टोमॅटो पिकाच्या मधील ६५ गांजाची झाडे जप्त केली. या झाडांचे वजन २१५ किलो असून बाजारात त्याची किंमत सुमारे ₹१२.९३ लाख इतकी आहे.
संशयित रवींद्र गांगुर्डे याने टोमॅटोच्या पिकामध्ये गांजाची लागवड विक्रीसाठी केल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, मालेगावचे अपर अधीक्षक अनिकेत भारती आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, प्रकाश जाधव तसेच हवालदार सुधाकर बागूल, प्रशांत पाटील आणि सतीश जगताप यांच्या पथकाने यशस्वीपणे कार्यवाही केली.
गांजाच्या झाडांची विक्रीसाठी लागवड करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली असून, या प्रकरणात अजून कोणाची सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी पुढील कठोर पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे.