नाशिक – संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त गणेशवाडी, पंचवटी येथील स्मारकास अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी फुले दाम्पत्यांच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव करत, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडने महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनाला खरा ‘शिक्षकदिन’ घोषित करण्याची मागणी केली. फुले यांनी समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवून शैक्षणिक क्रांती घडवली, त्यामुळे त्यांच्या कार्याला हा सन्मान मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य सरकारने ही मागणी विधिमंडळात मान्य करून अंमलबजावणी करावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. फुले दाम्पत्यांच्या बहुजन उद्धारासाठीच्या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. त्यांच्या मते, या महान व्यक्तिमत्त्वांना सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्यास त्यांच्या कार्याची योग्य पद्धतीने दखल घेतली जाईल.
संभाजी ब्रिगेड नाशिकने फुले, शाहू, आंबेडकर आणि विद्रोही संतांच्या विचारांचा जागर घडवण्यासाठी प्रबोधन पर्व सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमातून बहुजन समाजाला शिक्षण, समानता आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने प्रेरणा देण्याचा उद्देश आहे. अभिवादन कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामण नाना वाघ, नितीन रोठे पाटील, अनिल आहेर, प्रकाश गवळी, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रज्ञा टुपके, उपजिल्हाप्रमुख विकी गायधणी यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महात्मा फुले, शाहू महाराज, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रसार करून बहुजन समाजाला शिक्षण व सामाजिक समानतेसाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सामाजिक बदलासाठी अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सतत काम सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. महात्मा फुले यांचे विचार आजही सामाजिक परिवर्तनाचे मार्गदर्शक असून, त्यांचा प्रसार व जागर अत्यंत आवश्यक आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.