मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर राज्यात अजूनही सरकार स्थापन झालेले नाही. महायुतीने मिळवलेल्या प्रचंड बहुमतानंतरही मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोणाच्या गळ्यात माळ पडणार यावर सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्रिपदासह खातेवाटपावर चर्चा करण्यात आली. दीड तास चाललेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदासाठी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी आपला दावा केला होता. मात्र, शिंदे यांनी आपला दावा सोडल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले. भाजपच्या विजयामुळे मुख्यमंत्रिपदाचे प्राबल्य कायम ठेवण्याच्या पक्षाच्या भूमिकेला यामुळे अधिक जोर मिळाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप लवकरच मुख्यमंत्रिपदासह महायुतीतील खातेवाटपाची अधिकृत घोषणा करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी कार्यक्रम 30 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या खातेवाटपात अजित पवार गट आणि शिंदे गटाला महत्त्वाची खाती देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपद आणि दोन महत्त्वाची खाती दिली जातील, तर अजित पवार गटालाही महत्त्वाची खाती मिळतील, अशी माहिती मिळाली आहे. भाजपने 132 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. शिंदे गटाच्या 57 आणि अजित पवार गटाच्या 41 जागा मिळाल्याने महायुतीला सत्तास्थापनेसाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची घोषणा आणि खातेवाटपानंतर महाराष्ट्राच्या नव्या सरकारची वाटचाल सुरू होईल. राजकीय चर्चांनी भरलेल्या या तणावपूर्ण वातावरणात महाराष्ट्राच्या जनतेला आता अधिकृत घोषणेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.