घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश अंकुशराव टोपे यांच्या नामनिर्देशन सभेसाठी आज जनतेचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला. आपल्या समर्थकांनी दाखवलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे राजेश टोपे यांचा आत्मविश्वास आणि लढण्याची ताकद वाढली आहे. सभेच्या दरम्यान त्यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानत सांगितले की, “तुमचं आणि माझं नातं हे जिव्हाळ्याचं असून आज तुम्ही दाखवलेला प्रेम आणि पाठिंबा माझ्या आत्मविश्वासाला नवसंजीवनी देत आहे.”
राजेश टोपे यांनी कोरोना काळात केलेल्या सेवाकार्याचा उल्लेख करत, “तो काळ माझ्यासाठी जबाबदारीचा होता, जी तुमच्या विश्वासामुळे मी पूर्ण करू शकलो. आजही जनतेच्या सेवेत राहण्यासाठी आणि जबाबदाऱ्या निभावण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे,” असे ते म्हणाले.

सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका करत सांगितले की, “सध्या विरोधक फसव्या योजना दाखवत असून त्यातून जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र, शेतीमालाला हमीभाव नाही, तरुणांना रोजगार नाही, माता-भगिनींना सुरक्षितता नाही, हे सत्य तुम्ही जनतेसमोर आणावे.”
राजेश टोपे यांच्या नामनिर्देशन सभेत आलेल्या जनतेने त्यांना प्रचंड पाठिंबा दिला आणि लढाईसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. या पाठिंब्याबद्दल आभार मानताना राजेश टोपे यांनी आश्वासन दिले, “तुमच्या प्रेमाच्या शिदोरीने मी पुढेही तुमच्यासाठी जीव ओतून काम करेल,” असे त्यांनी सांगितले.
