शिर्डी :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीने प्रचारसभांचा धडाका लावला असून, शिर्डीतील सभेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली.
प्रियंका गांधींनी आपल्या भाषणाला ‘जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘साईबाबाजी की जय’ अशा घोषणांद्वारे सुरुवात केली. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्र ही सामाजिक क्रांतीची भूमी आहे. इथे महात्मा फुले, शाहू महाराज, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आहे. मात्र, मोदी सरकारने महाराष्ट्राला दुर्लक्षित केले आहे.”
मोदी सरकारवर गंभीर आरोप
प्रियंका गांधींनी शिवाजी महाराजांचा अपमान, संसदेबाहेरच्या पुतळ्याची उपेक्षा, आणि महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांत हलवल्याचे मुद्दे उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून मोदींना खुले आव्हान देत, “एकदा जाहीर करा की तुम्ही जातीय जनगणना करणार आहात,” असे सांगितले.
‘लाडकी बहिण योजना’वरून टीका
प्रियंका गांधींनी राज्य सरकारवर टीका करताना लाडकी बहिण योजनेला निवडणुकीपूर्वीचा स्टंट असे म्हटले. त्या म्हणाल्या, “दोन-तीन वर्षे गप्प राहून आता महिलांना १५०० रुपये देऊन मतं मिळवायची आहेत, पण महिलांनी हे लक्षात ठेवावे की इतक्या वर्षांत का नाही मदत केली?”
महागाई आणि बेरोजगारीवरून हल्लाबोल
महागाईच्या मुद्द्यावर प्रियंका म्हणाल्या, “राज्यात महागाई गगनाला भिडली असून, कराच्या माध्यमातून जनतेवर बोजा टाकला जात आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील आर्थिक विकासासाठी काहीच केलेले नाही.” प्रियंका गांधींच्या या सभेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवले असून, निवडणूक प्रचार अधिक तीव्र होत आहे.