नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रचारासाठी आयोजित शोभायात्रेला मुंबई नाका येथून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला. माजी नगरसेविका सुमन भालेराव, अर्चना थोरात, तसेच माजी नगरसेवक संदीप लेनकर यांच्या नियोजनाखाली प्रभाग १५ मधील विविध ठिकाणी शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.
मतदारांशी थेट संवाद
सावित्रीबाई फुले शाळा, काठे गल्ली चौक, संत सावता माळी उद्यान, स्वामी समर्थ केंद्र यांसारख्या प्रमुख ठिकाणी शोभायात्रेचा थांबा झाला. महिलांनी औक्षण करून, ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद देऊन, तर पुरुषांनी शाल आणि पुष्पगुच्छ देत देवयानी फरांदे यांचे स्वागत केले. मतदारांनी विक्रमी यशासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
शोभायात्रेदरम्यान भाभानगर येथील नवशक्ती चौकात प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. माजी नगरसेवक संदीप लेनकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या.
महायुतीसाठी जोमदार प्रचार सुरू
बंटी तिदमे, तेजश्री काठे, नाना शिलेदार यांसह असंख्य पदाधिकारी आणि नवमतदारांचा यात सहभाग होता. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा पाठिंबा यामुळे नाशिकमधील निवडणुकीत महायुतीला बळ मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.