नाशिक :- नाशिकच्या ‘नृत्याली भरतनाट्यम अकॅडमी’ या संस्थेचे २१ वे वार्षिक स्नेहसंमेलन १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी कालिदास कलामंदिर येथे उत्साहात पार पडले. ‘नृत्याली’ गेली २१ वर्षे गुरू सोनाली करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून नृत्यालीच्या नृत्यांगनांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील नावलौकिक मिळवला आहे.
भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचे विद्यार्थी जेव्हा आपले विशारदचे शिक्षण पूर्ण करतात तेव्हाच अरंगेत्रमद्वारे आपली कला गुरुसमोर सादर करतात. परंतु नृत्यालीच्या सर्व विद्यार्थ्यांना व्यासपीठाची ओळख व्हावी तसेच त्यांना व्यासपीठावर कला सादर करताना कसलेही दडपण येऊ नये म्हणूनच दरवर्षी नृत्याली तर्फे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. यावेळी रसिक प्रेक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष आमंत्रण दिले गेले, आपला पाल्य नृत्य क्षेत्रात किती रूळला आहे, स्वतःला कसे सादर करतो हेदेखील पालकांना पाहावयास मिळाले. नृत्यालीच्या नवप्रवेशीत छोट्या विद्यार्थिनींनी गणेशवंदना द्वारे अतिशय सुंदर हस्तमुद्रा, अभिनय करत व्यासपीठावर पदार्पण केले ज्याला रसिक प्रेक्षकांची उस्फूर्त दाद मिळाली.
प्रथम वर्ष ते पाच वर्षापर्यंत ज्यांचे नृत्य शिक्षण झाले त्या विद्यार्थ्यांनी सरस्वती कौतुकम, महगणपतीम, माता कलिका यांना आपली कला समर्पित केली. तसेच यंदा अयोध्या येथे झालेल्या श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली हे ध्यानी घेऊन श्रीरामाच्या गीतांवर खास नृत्यारचना सादर करण्यात आल्या ज्यात विद्यार्थ्यांचे वैयक्तिक तसेच समूह नृत्य झाले. नृत्यकला केवळ छंद म्हणून जोपासणारे खूपजण असतात, परंतु नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन पूर्णवेळ त्यातच करिअर करू पहाणारे नृत्यालीच्या वेदान्त पोतन, आर्या हिरे, वैशाली टांक, सिद्धि देशमुख, रिचा बापट या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले तसेच प्रथम श्रेणीमध्ये विशारद पूर्ण करणार्या पुर्वा भानोसे, खुशी रोजेकर, तनिशा पोरजे, ऐश्वर्या अफझूलपूरकर यांचा नृत्यालीतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षी सिंगापूर येथे आयोजित एसीएससी फेथ सेंटर परफोर्मिंग आर्ट्स स्पर्धेत नृत्यालीच्या नृत्यांगनांनी सुवर्ण, रजत पदकांवर मोहोर उमटवली होती. त्या यशस्वी प्रवासाची विशेष चित्रफीत या वेळी दाखवण्यात आली.
या क्षेत्रात जे यश तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनतीची आणि सातत्याची जोड द्यावी लागेल असे मार्गदर्शन गुरु सोनाली करंदीकर यांनी यावेळी केले. एक्युब हाॅलीडेजचे संचालक श्री अभिजीत धारणकर यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे सिंगापूर सारख्या नवख्या देशात जाऊन नृत्याली आपल्या यशाची छाप पाडू शकली तसेच या अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी नुसार सराव करता यावा म्हणून ईगल स्पोर्ट्स क्लब हॉल उपलब्ध करून देणार्या श्री. मनोज मालपाणी यांचे देखील सहकार्य अनमोल आहे असे प्रतिपादन सौ. करंदीकर यांनी केले आणि या दोहोंचा विशेष सन्मान केला. या स्नेहसंमेलनाची प्रकाश योजना श्री. आदित्य रहाणे, ध्वनि योजना श्री. पराग जोशी तर अनुराधा मटकरी यांनी सूत्रसंचालन केले. या सर्व सोहोळ्याचे संयोजन नृत्याली अकॅडेमी तर्फे करण्यात आले होते तसेच अकॅडेमीच्या सर्व आजी-माजी विद्यार्थिनीचे खास योगदान लाभले.