नाशिक – मालेगाव येथील नाशिक मर्चंट बँकेच्या शाखेत गेल्या १५-२० दिवसांत १२ बेरोजगार तरुणांच्या खात्यांवर १०० ते १२५ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून, त्यांची कागदपत्रे आणि सह्या घेऊन बनावट खाती उघडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिराज अहमद नावाच्या व्यक्तीने नोकरीचे आमिष देऊन आधार व पॅन कार्डचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.
तरुणांचा आणि शिवसेनेचा आक्रोश; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणात फसवणूक झालेल्या तरुणांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मदतीने पत्रकार परिषद घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे जाऊन तरुणांनी या प्रकरणात चौकशीची मागणी केली असून, अपर पोलीस अधीक्षकांकडे देखील लेखी तक्रार देण्यात आली आहे.
बँकेचा बचाव; “व्यवहार नियमित, पण खाते गोठवले”
दरम्यान, नाशिक मर्चंट बँकेच्या शाखा व्यवस्थापक रवींद्र कानडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, खात्याचे व्यवहार रीतसर कागदपत्रांच्या आधारेच झाले असून सर्व व्यवहार ऑनलाईन असल्याने तत्काळ लक्षात आले नाही. मात्र, तरुणांनी तक्रार केल्यानंतर खात्यांचे स्टेटमेंट पुरवण्यात आले असून, खात्यातील रक्कम गोठवली आहे.
राजकीय वातावरण तापले; निवडणूक काळातील शंभर कोटींच्या व्यवहारांमागे मोठी खेळी?
राजकीय वातावरणात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांत १०० कोटींच्या उलाढालीचे घोटाळ्याचे कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.