नाशिकमध्ये ब्रह्माकुमारी मेरी सेवा केंद्रात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी उपस्थितांना आशीर्वाद देत, जीवनात सदैव शुभभावना ठेवण्याचे महत्व स्पष्ट केले. “आपण इतरांना जे देतो, तेच आपल्याला परत मिळते,” असे सांगून दीदीजींनी प्रत्येकाने शुभेच्छा आणि शुभभावनेचे बीज मनात रुजवावे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे, म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. गोपाळ साळुंखे यांनी ब्रह्माकुमारींच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले आणि समाजात चांगल्या मूल्यांचा प्रचार होण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या दरम्यान, आत्मजागृती आणि आध्यात्मिकतेच्या महत्त्वावर भाष्य करताना दीदींनी राजयोगा मेडिटेशनचे महत्व अधोरेखित केले, जे मानसिक शांती आणि समाधान मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. जिल्हा मुख्याध्यापक संघ मार्गदर्शक एन.एन. खैरनार यांनी सध्याच्या समाजातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ब्रह्माकुमारी संस्थेचे कार्य प्रभावी आणि आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, ज्यामध्ये शहरातील ब्रह्माकुमारी संचालक आणि साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वाटप झाले, तर कुमारी सोनाक्षी आणि कुमारी ज्ञानेश्वरी यांनी सादर केलेल्या नृत्याने दिवाळी महोत्सवाला विशेष रंग भरला.