महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पोषक वातावरण असून, उत्तर महाराष्ट्रात नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जागा निवडून येतील, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे व्यक्त केला. माघारीच्या आदल्या दिवशी नाशिकमधील तीनही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
महाजन यांनी विद्यमान आमदार, उमेदवार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधून नाराजी आणि गैरसमज दूर केल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा याच प्रकारे दावा असताना अपेक्षित यश मिळाले नव्हते, असे विचारले असता, महाजन यांनी फेक नरेटिव्हची टीका करत मतदार सरकारच्या कामाबद्दल समाधानी असल्याने असे नरेटिव्ह यावेळी यशस्वी होणार नाही, असे मत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी संजय राऊत, मनोज जरांगे, आणि राज ठाकरे यांच्या भूमिकांवर देखील टीकास्त्र सोडले. “चार तारखेनंतर बंडोबा शांत होतील आणि निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल,” असा आत्मविश्वास महाजन यांनी शेवटी व्यक्त केला.