राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर समीर खान यांच्यावर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवाब मलिक यांनी सोशल मिडिया (एक्स) अकाऊंटवरून ही दुःखद माहिती दिली आहे.
समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांचे पती होते. तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले असताना, परतण्याची वाट पाहत असताना त्यांच्यावरच स्वतःच्या चालकाने कार चुकून घालवली. चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी यांच्या पायाचा अचानक एक्सलेटरवर दबाव आल्याने कार थेट समीर खान यांच्यावर धडकली. या भयानक अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली, विशेषतः मेंदूला मोठा फटका बसला होता.
दरम्यान, उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा दिसून आली होती, परंतु अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघाताने मलिक कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.