नाशिक शहरातील ब्रह्माकुमारी संस्थेच्या पंचवटी सेवा केंद्राचा ५१ वा वर्धापन दिन आणि दीपावली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी संस्थेच्या जिल्हा मुख्य प्रशासिका वासंती दीदी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने या उत्सवाला सुरुवात झाली, यावेळी दिंडोरी येथील नायब तहसीलदार वसंतराव धुमसे, महर्षी चित्रपट संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पगारे, आणि पारख क्लासेसचे लोकेश पारख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात पंचवटी सेवा केंद्राच्या जुन्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. वासंती दीदींसह ब्रह्माकुमार कृष्णा भाई, बीके सुरेश साळुंके सर, ब्रह्माकुमारी वीणा दीदी, विणु दीदी, आणि गोदावरी दीदी यांचा शाल व ताज अर्पण करून सन्मान करण्यात आला. आपले अनुभव कथन करताना वासंती दीदी यांनी पंचवटी सेवा केंद्राचा इतिहास आणि अध्यात्माच्या वाटेवर चालण्यासाठी याची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
ब्रह्माकुमारी वीणा दीदी यांनी गीता दीदींच्या कठोर नियमांच्या अनुभवांबद्दल सांगत लॉ आणि लव्हचा समतोल साधणारे वासंती दीदींचे प्रेमळ नेतृत्व कसे लाभले, याबद्दल आपले विचार व्यक्त केले. ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनीही त्यांच्या सेवाकाळातील आठवणी शेअर केल्या. पंचवटी केंद्रातून त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला कसा आरंभ झाला, हे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात कु. तनया हिने स्वागत नृत्य सादर करून केली, तर ब्रह्माकुमार ओंकार यांनी दिवाळी सणाच्या गीताने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना वासंती दीदींच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले. पंचवटी सेवा केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित साधक, प्रमुख भगिनी, आणि नाशिक शहरातील राजयोग साधकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन पंचवटी सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी यांनी केले, आणि त्यांचे कौतुक सर्व स्तरातून करण्यात आले.