शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने यंदा रब्बी हंगामातही केवळ एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. सरकारने २०२३ पासून २०२५-२६ पर्यंत सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येईल. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिकतेवर आधारित ही योजना उपलब्ध असून अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
अर्जासाठी शेतकऱ्यांना pmfby.gov.in पोर्टल तसेच बँक, विमा कंपनीचे प्रतिनिधी, किंवा सामूहिक सेवा केंद्रांमार्फत नोंदणी करता येईल. रब्बी गहू बागायती, हरभरा आणि कांदा या पिकांसाठी अधिसूचित ७० टक्के जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे, आणि उर्वरित विमा रक्कम राज्य शासनाकडून भरण्यात येईल.